ब्रॅण्डचे नाव : KAYSONS
ब्रॅण्डची स्थापना : २०१७
ब्रॅण्ड कशाचा आहे? : Frozen Foods
सुजाता कदम मूळच्या सातारच्या शेतकरी कुटुंबातील. त्यांचे वडील दूध आणि शेतीचा व्यवसाय करत. आई गृहिणी. वडिलांची परिस्थिती बेताची. त्यामुळे बी. कॉम करत असतानाच त्या टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये अकाउंटिंगची कामे करत. त्यांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर “कळायला लागल्यापासून” स्वयंपाक करता येत होता.
वेगवेगळे पदार्थ घरातील मंडळींना खाऊ घालणे हा त्यांचा छंद होता. सातारच्या अजित कदम यांच्याशी त्यांचे लग्न झाले. अजित यांचा साताऱ्यामध्ये वॉटरप्रुफिंगचा व्यवसाय होता. लग्नानंतर सुजाताही त्यांना मदत करू लागल्या. त्याचसोबत त्या अकाउंटिंगची कामेही करत होत्या.
लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांनी व्यवसायवाढीसाठी पुण्याला यायचे ठरवले. २००४ मध्ये पुण्यात आल्यावरही सुजाता अकाउंटंट म्हणून नोकरी करत होत्या, परंतु त्यांना जास्त रूची पाकशास्त्रात होती. हे क्षेत्र त्यांना खुणावत होते. त्यांनी मुलं हीच त्यांच्या व्यवसायाचे प्रेरणा म्हणता येईल.
मुलांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे किंवा आवडत नसलेल्या भाज्यांचे पराठे करून देणे हे त्या करत होत्या. तेव्हा त्यांना जाणवलं बऱ्याच नोकरदार महिलांना हे करणं जमत नाही. व्यवसाय सांभाळताना घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणं शक्य होत नाही.
आपणच आपल्या या पाककलेचा व्यवसाय सुरू केला तर? सुजाताच्या मनात विचारचक्र सुरू झाले. त्यांनी पुण्यात मिटकॉन येथून प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी काही पदार्थांची निवड केली. त्यांची बरीचशी उत्पादने फ्रोझन फुड प्रकारातली आहेत. त्यातील काही पदार्थ एक ते दीड वर्ष टिकतात. जेव्हा वाटेल तेव्हा गरम करून खाता येतात.
फ्रोझन फुडला परदेशात खूप मागणी आहे. ही उत्पादने उत्तम राहण्यासाठी कोल्ड चैनची काळजी घ्यावी लागते. जेव्हा त्यांनी ही उत्पादने करायची ठरवले, तेव्हा बरीच आव्हाने समोर होती. सुरुवातीची दीड – दोन वर्षे अगदी छोट्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी हा व्यवसाय सुरू करून बघितला.
दीड वर्षं डीप फ्रीजमध्ये ठेवलेला पराठा तेवढाच ताजा, पौष्टिक आणि चविष्ट असतो. याची त्यांनी आधी स्वतः खात्री करून घेतली. छोट्यामोठ्या ऑर्डर्समधून त्यांना त्यांच्या उत्पादनांबद्दल ग्राहकांची मतं कळत गेली. त्यानंतर हा व्यवसाय मोठा करायचे त्यांनी ठरवले.
घरच्यांनी खूप मदत केली. प्रोत्साहन दिले आणि सुजाताचे स्वप्न साकार झाले. त्यांनी उत्पादनासाठी जागा बघितली. आठ-नऊ स्त्रिया सोबतीला घेतल्या. त्यानंतर डीप फ्रीजर, स्टफिंग मशीन, डो मेकिंग मशीन, भट्टी अशी आवश्यक ती यंत्रसामुग्री खरेदी केली आणि ‘चवदार फुड्स प्रा. लि.’ या कंपनीची सुरुवात झाली.
पराठ्यासाठी उत्तम पॅकेजिंग करून घेतले. त्यानंतर वेबसाइट, मार्केटिंग करत करत त्यांचे पराठे बिग बाझारसारख्या रिटेल चैन आणि हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात जाऊ लागले. त्यानंतर ट्रेंड मार्क नोंदणी करून के सन्स (कदम सन्स) या ब्रँडने उत्पादने वितरित करायला सुरुवात केली.
ताज्या भाज्या आणि गव्हाच्या कणकेपासून हे पराठे हाताने लाटून बनवले जातात. पूर्वी फक्त आलू पराठे बनवणाऱ्या सुजाता आता अनेक प्रकारचे फ्रोझन स्टफ पराठे बनवतात. याचसोबत फ्रोझन खवापोळी, पुरणपोळी, मोदक, पावभाजी, पुलाव असे रेडी टू इट पदार्थ आता त्यांच्या यादीत आहेत. हे सर्व फ्रोझन पदार्थ डीप फ्रीजमध्ये ठेवून टिकवता येतात व हवे तेव्हा गरम करून खाता येतात.
भविष्यात त्यांना आपली उत्पादने वाढवायची आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची आउटलेट व सर्विंग काउंटर बनवत आहेत. असेच एक आउटलेट खोपोली येथील फुड मॉलमध्ये सुरू केले आहे. त्या वेगवेगळ्या प्रदर्शनांत, पेठांत भाग घेतात.
मीनल मोहाडीकर यांच्यासोबत त्यांनी दुबई बिझनेस टुर करून परदेशात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र शिकून घेतले आहे. सामाजिक भान म्हणून वृद्धाश्रमाना पराठे देतात. त्यांच्या व्यवसायवृद्धीचे गमक म्हणजे गुणवत्ता, ताजेपणा, उत्तम पॅकिंग आणि स्वाद.
– मानसी बिडकर
(हा लेख ‘झी मराठी दिशा’ अंकातून साभार)
कंपनीचे नाव (ब्रॅण्डच्या नावापेक्षा वेगळे असल्यास) : Chavidar Foods Pvt Ltd
कंपनीच्या डायरेक्टर्सची नावे :
१) सुजाता अजित कदम
२) चैत्राली अजित कदम
संपर्क : ९९२२६१७९४३